खेड तालुक्यातील दहा गावे आणि ४९ वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई   

राजगुरूनगर, (वार्ताहर) : खेड तालुक्यातील दहा गावे आणि त्यांच्या ४९ वाड्या-वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरचे प्रस्ताव खेड पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी तीन गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे  यांनी दिली.
खेड तालुक्यात दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर पाण्याची टंचाई निर्माण होते. कायमस्वरूपी स्रोत किंवा उद्भव नसल्याने उपलब्ध पाणी योजना टंचाई काळात निरुपयोगी ठरतात. अनेक गावांच्या वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.     
 
तालुक्यात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पूर, वरुडे, जऊळके येथे टँकर सुरू झाले होते; तर एप्रिल, मे आणि जून महिन्यात तालुक्यात तब्बल १५ टँकरने २१ गावे व त्यांच्या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तीन गावांना टँकरने पाणी पुरवण्यास सुरुवात झाली आहे.
 
खेड पंचायत समितीकडे वरुडे, वाफगाव, गुळाणी, कोयाळी तर्फे वाडा, वडगाव नजीक खेड, गोसासी, वाडा, बहिरवाडी, साबुर्डी आणि वाकळवाडी अशा दहा गावांसह ४९ वाड्या-वस्त्या मिळून १६ हजार ८७४ नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी वडगावनजीक खेड येथे पाणी काही प्रमाणात उपलब्ध आहे. तर पुर्व भागातील वरुडे, वाफगाव आणि गुळाणी या गावांमध्ये ३० मार्चपासून टँकर सुरू झाले आहेत. वरुडे गावठाण, गणेशनगर, चौधरवाडी, पांढरवस्ती, अलीकड पलीकडची बेंद, मुलकीवस्ती, नालगड, पंचवाडी, कातोरेमळा, पलीकडील नहयार, तांबेवाडी, वाळुंजस्थळ यांना दिवसाला ५ फेर्‍या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाफगाव मांदळेवस्ती, गावठाण, मांदळेवाडी, टाकळकरवाडी, लंगोटेवस्ती, रामाणेवाडी आणि शिंदेवस्ती यांना दिवसाला पाच फेर्‍या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गुळाणी गावठाण, आरुडेवस्ती, ढेरंगेवस्ती, गुळानकरवस्ती, भिगावस्ती, जरेवाडी रस्ता, सिद्धार्थनगर या वाड्या-वस्त्यांना टँकरच्या तीन फेर्‍यांद्वारे पिण्यासाठी पाणी पुरविण्यात येत आहे.
 

Related Articles